करमाळा-
करमाळा तालुक्यातील जेऊर, उमरड आणि पांगरे येथील मंडल अधिकारी, सेतु केंद्राच्या माध्यमातून जेऊर गावातील अनधिकृत सेतू केंद्रांमधून नागरिक आणि शेतकऱ्यांची सर्रास लुट करत आहेत. असा गंभीर आरोप माहिती अधिकार फेडरेशनचे प्रविण मखरे यांनी केला आहे. भारत सरकारच्या डिजीटल इंडिया मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आलेले ‘आपले सरकार ई-सेवा केंद्राच्या’ माध्यमातून, ग्रामीण भागातील नागरिकांना सरकारी सेवा सुलभपणे मिळावी. यासाठी सदरची केंद्रे नागरिकांच्या सुलभतेसाठी सुरु केलेली आहेत. परंतु जेऊरमधील केंद्रे भ्रष्टाचाराची केंद्रबिंदू बनली आहेत. व येथील मंडल अधिकारी सेतू माफियांशी संगनमताने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची उघडपणे लेट करत असल्याचा गंभीर आरोप मखरे यांनी केला आहे.
पुढे बोलताना मखरे म्हणाले कि, आमच्या माहितीनुसार जेऊर गावात आणि परिसरातील काही सेवा केंद्र चालक, मंडल अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनधिकृतपणे सेतू चालवत आहेत. यातून नागरिकांकडून जास्तीचे पैसे आकारले जात आहेत. कागदपत्रे थांबवून, शेतकऱ्यांकडून थेट वसुली केली जात आहे. त्यामुळे जनतेच्या हक्काच्या सेवांवर दलालांचा कब्जा आहे. ही उघडपणे होणारी लूट तात्काळ थांबवावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माहिती अधिकार फेडरेशनचे प्रविण मखरे यांनी दिला आहे.
चौकट….
स्थानिक प्रशासन आणि महसूल विभाग या घोटाळ्याकडे डोळेझाक करत असल्यामुळे, नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. “सरकारी योजनेचे डिजीटल स्वरूप लुटीचे साधन बनले आहे का?” असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. तरी या सर्व बाबींवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरीत लक्ष देऊन, सदरचा गैरप्रकार करणारांवर योग्य ती कारवाई करावी. अशा प्रकारची मागणी देखील प्रविण मखरे यांनी केली आहे.























